“जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा…” आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन मनसेची टीका

मुंबई : युवा सेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मंत्री एकनाथ शिंदे सोमवारपासून अयोध्येत तळ ठेकून आहेत. तसेच राज्यातील हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. यावरून आता मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्य दौऱ्यावरून जोरदार टीका केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं की, “आज एक जुनी गोष्ट आठवली जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेल सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील. फक्त राज ठाकरे तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरक आहे,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून १० ते १२ हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे पोस्टर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहे. शरयू तीरावर शिवसैनिकांचे जत्थे जमायला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या महाआरतीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

Share