देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नाही?, भाजपने सांगितले कारण..

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं पण राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावना राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. आता, भाजपने राष्ट्रवादीच्या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. तसेच, देहूतील कार्यक्रम हा सरकारी नसून खासगी होता, असेही भाजपने म्हटले आहे.

भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून म्हटलं की, देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खासगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. याशिवाय स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली. पण, त्यांनी नकार दिला, असे भाजपने अधिकृतपणे सांगितले आहे.

 

तसेच, नरेंद्र मोदींच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपाकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपासाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राची द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत, स्वत:चा अहंकार नाही, अशा शब्दात भाजपने राष्ट्रवादी समर्थकांना टोलाही लगावला आहे.

देहूतील कार्यक्रमात काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी राज्यभरातून वारकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते. परंतु सुत्रसंचालकाने नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला. परंतु अजित पवार यांनी पंतप्रधानांना बोलण्यास सांगितले.

Share