मुंबई : राज्य सरकारच्या वाईन विक्री धोरणामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. राज्यातील द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारवर टिका सुरु असताना आता मनसेने देखील यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
“कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा, कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिणाऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?” असा सवाल मनेसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे शिवेसेना नेते संजय राऊत यांना उद्देशून केला आहे.
करोना च्या पहिल्या लाटे मध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या "संजय" ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 31, 2022
२०२० मध्ये करोना महामारीच्या संकटामुळे राज्याचे अर्थचक्र बिघडलेलं असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील ‘वाईन शॉप्स’ सुरु करायला काय हरकत आहे? असा सवाल केला होता. मात्र तेव्हा या गोष्टीला विरोध करण्यात आला आणि संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून यावर टिका देखील केली होती. मात्र आता राज्य सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपन आहे का असा सवाल निर्माण होतो.