मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केल्याचे बोलले जात असले तरी, यामुळे शिंदे यांनी मनसेशी गाठ बांधण्याच्या दृष्टीने चर्चा केली असल्याच्या चर्चा राजकारणात रंगत आहेत. यावरूनच शिवसेनेच्या महिला नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ट्वीटरवरून निशाणा साधला आहे.
दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली, असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता ११ वरून १ वर आले आहेत. आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते, वजा नाही. त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशोब बघून घ्या. मनसे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन आहे,” असे ट्वीट दीपाली सय्यद यांनी केले आहे.
मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता ११ वरून १ वर आले आहेत आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते वजा नाही त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशेब बघुन घ्या. मनचे हा पक्ष नसुन डिपॅाझिट जप्तची मशिन आहे.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 27, 2022
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला तूर्त दिलासा दिला आहे. ११ जुलैपर्यंत निलंबनाची कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तर दुसरीकडे कोर्टाच्या या आदेशानंतर एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबईत येऊन भेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी गुवाहाटीमध्ये बैठका आयोजित केल्या जात आहेत.