मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी १० वाजता ही सभा होणार आहे. पुण्यातल्या या सभेत राज ठाकरे आज कुणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झालाय. राज आज या दौ-याविषयी तसंच राज यांना विरोध करणा-या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविषयी काय भाष्य करणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान, या सभेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षितता त्याचप्रमाणे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी घातल्या ‘या’ अटी

१ सदर सभा ही २२ -०५ -२०२२ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात आली असून कार्यक्रम स्थळ आणि वेळेत बदल करू नये.

२ सभेत सहभागी होणाऱ्या वक्त्यांनी भाषण करताना दोन समाजामध्ये धार्मिक, जातीय तेढ निर्माण होणार नाही, तसेच विशिष्ट समाजाच्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.

३ सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा वंश, जात, भाषा, प्रदेश, जन्मस्थळ किंवा ते पाळत असलेल्या रूढी परंपरांचा अपमान होणार नाही किंवा त्यांना चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी.

४ सभेत सामील होणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यांनी स्वयंशिस्त पाळावी, तसेच सभास्थळी वेगवेगळ्या भागातून येताना किंवा जाताना इतर धर्म/जात/पंथ यावर टीका-टीप्पणी तसेच कार्यक्रमस्थळी हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाहीत. तसेच सभेच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य, खाणाखुणा तसेच निशाणा दाखविणार नाहीत.

५ कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटकं पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शन करू नये. शस्त्र अधिनियमातील कायदेशीर तरतूदींचं उल्लंघन होणार नाहीत, याची काळजी घेतील.

Share