मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. हवामान बदल आणि पावसाची शक्यता असल्यामुळे ही सभा रद्द केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ही सभा पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागस्कर यांनी दिली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवार (१७ मे) पासून पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच अन्य काही ठिकाणी भेटी दिल्या. आज बुधवारी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या अगोदर मुंबई, औरंगाबाद येथे त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर जाहीर सभा घेतली होती. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेऊन रणशिंग ते फुंकणार असल्याचे बोलले जात होते. डेक्कन भागातील भिडे पुलाजवळील नदी पात्रात ही सभा घेणार असल्याचे मनसेकडून जाहीरही करण्यात आले होते. मनसे कार्यकर्त्यांनी या सभेसाठी तयारीही सुरू केली होती.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी देण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत सर्व परिस्थिती पाहून पुणे पोलिस आयुक्त या सभेला अंतिम परवानगी देतील, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानुसार पोलिसांकडून सभास्थळाची पाहणीही करण्यात आली होती. मात्र, आता हवामान खात्याने २१ मे रोजी पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या शक्यतेने राज ठाकरे यांची ही सभा सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, राज ठाकरेंची सभा पुढील आठवडाभरात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज ठाकरे उद्या सकाळी अकराच्या सुमारास सभेचे ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत. सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचेही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. अयोध्या दौऱ्याच्या अगोदर राज ठाकरे यांची सभा होणार का? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Share