मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये आमदारांसाठी मोठी घोषणा केली. राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत मोफत घरं देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. सामान्य जनतेमधून मात्र आधीच कोट्याधीश असणाऱ्या आमदारांना पुन्हा मोफत घरे कशासाठी? असा सवाल देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं या निर्णयावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे.त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा. @OfficeofUT @CMOMaharashtra
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 25, 2022
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना हा खर्च कोणाच्या सांगण्यावरून केला जात आहे, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. मुळात हे कशासाठी हवंय? आमदार निवास उपलब्ध आहे. निवडून येणाऱ्या आमदारांची मुंबईत येतात तेव्हा राहण्याची सोय होते. मग ही मोफत घरं कशासाठी? राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट आहे. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जात नाहीत. वीज कापणी जोरात सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही म्हणून संपावर आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचीही अशीच अवस्था आहे. पैसे नाहीत म्हणू नोकरभरती होत नाही. मग हा अवाढव्य खर्च नेमका कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं सरकारला साध्य काय करायच ? की तुमचं सरकार डळमळीत होतय, म्हणून आमदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे ? मुळात या प्रकाराची गरज काय? जनतेच्या पैशाच्या जीवावर मजा लुटणारे तुम्ही कोण? यासाठी सरकारने सार्वमत घेऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्यानंतरच यावर निर्णय घ्यावा. जनता सूज्ञ आहे. जनता नक्कीच याला विरोध करेल”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.