औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबादचा पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये आठ ते दहा दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतो. त्यातही ड्रेनेज मिश्रीत पाणी येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. याविरोधात सिडको-हडकोतील नागरिकांनी दोन वेळा आंदोलन केले. त्याला भाजपनेही पाठींबा दिला होता. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असताना हाच मुद्दा घेऊन आता मनसेही पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहे. मनसेतर्फे’पाणी संघर्ष यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
काल पत्रकार परिषद घेऊन मनसेने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर म्हणाले, शहराच्या पाणी समस्येवर १४ मे पासून पाणी संघर्ष यात्रा काढून घरोघरी जाऊन २५ हजार लोकांकडून पत्रे लिहून घेणार आहोत. नंतर ही सर्व पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त आहेत. गेल्या २५ वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. अनेक भागांत रात्री ३ वाजता पाणी सोडले जाते. काही ठिकाणी लाइनमनला कोणत्या भागात पाणी सोडायचे, कोणत्या भागात नाही यासाठी दबाव टाकला जातो. मनपा प्रत्येक टँकरवर जीपीएस बसवणार होती. मात्र, ८५ पैकी ४० टँकरलाच जीपीएस बसवले. ज्या ठिकाणी टँकर भरले जातात, तेथे बारकोड यंत्रणा का बसवली नाही, असा सवाल खांबेकर यांनी केला. तसेच जोपर्यंत औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडविल्या जात नाही तोपर्यंत मनसे आता शांत बसणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
पत्रकार परिषदेत पक्ष प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, दिलीप बनकर,वैभव मिटकर, महानगरअध्यक्ष बीपीन नाईक, शहराध्यक्ष गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, जिल्हा सचिव अनिकेत निलावार, प्रशांत जोशी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राजू जावळीकर, संकेत शेटे, जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष अभय देशपांडे, शहर सचिव राहुल पाटील, उपशहर अध्यक्ष गणेश सोळुंके पाटील, अविनाश पोफळे, अभय मांजरमकर, रामकृष्ण मोरे, अमित ठाकूर, प्रतिक गायकवाड, गजानन गोमटे, अमित दायमा, चिन्मय कुलकर्णी, प्रल्हाद लहिरे, सारंग पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.