नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज (बुधवार) एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. मोदी सरकारने एकूण १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२२-२३ या वर्षासाठी धान पिकाचा ‘एमएसपी’ १०० रुपयांनी वाढवून २,०४० रुपये प्रतिक्विंटल केला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही ‘एमएसपी’ वाढवण्यात आला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७ खरीप पिकांच्या नवीन ‘एमएसपी’ला मंजुरी देण्यात आली. तिळाच्या किमतीत ५२३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुगाच्या भावात प्रतिक्विंटल ४८० रुपयांची वाढ होणार आहे. सूर्यफुलावर प्रतिक्विंटल ३५८ तर भुईमुगाच्या दरात प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी वाढ होणार आहे. यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने तूर डाळीच्या एमएसपीमध्येही वाढ केली आहे. यावेळी तूर डाळीचाचा एमएसपी’ ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला असून, गेल्या वेळेपेक्षा यंदा ‘एमएसपी’ प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. सध्या २०२१-२२ साठी ‘एमएसपी’ १९४० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. आता धानाचा ‘एमएसपी’ २०४० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला असून, धानाच्या ‘एमएसपी’मध्ये प्रति क्विंटल १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
याप्रसंगी ठाकूर म्हणाले, २०१४ पूर्वी एक-दोन पिकांवर खरेदी केली जात होती; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून यामध्ये उर्वरित पिकांचीही भर पडली आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. ‘एमएसपी’ ही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी मिळणारी किमान आधारभूत किंमत आहे. बाजारातील पिकांच्या किमतीतील चढ-उताराचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही, म्हणजेच बाजारात त्या पिकाचे भाव जरी कमी असले, तरी शेतकऱ्यांना एमएसपी आहे. पेरणीच्या वेळी ‘एमएसपी’ची माहिती घेतल्याने शेतकऱ्यांचे मनोबलही उंचावते आणि त्यांना पिकाला चांगला भाव मिळतो. यावेळी सर्व १४ खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह १७ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.
Cabinet approves MSPs for Kharif Marketing Season 2022-23: Union Minister Anurag Thakur pic.twitter.com/SIaZgb8EBF
— ANI (@ANI) June 8, 2022
आजच्या बैठकीत एकूण १७ खरीप पिकांसाठी ‘एमएसपी’ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी जसे ठरवण्यात आले होते की, खर्च अधिक ५० टक्के तो निर्णय आम्ही सातत्याने पुढे नेला आहे. किसान सन्मान निधीअंतर्गत २ लाख कोटी रुपये खात्यात गेले आहेत. खतावर २ लाख १० हजार कोटींचे अनुदान देण्यात आले आहे.
कृषी अर्थसंकल्पात १ लाख २६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ
कृषी अर्थसंकल्पदेखील १ लाख २६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. आमच्या सरकारने इतरही अनेक पिकांना ‘एमएसपी’च्या कक्षेत आणले आहे. विम्यापासून सिंचनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सक्षमीकरण झाले आहे. कृषी क्षेत्रासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. पीक विविधतेला प्रोत्साहन देताना सरकारने ‘एमएसपी’च्या दरात ऐतिहासिक वाढ केली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांची विक्रीही वाढली. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. यासोबतच शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले.