अर्ज करुन महिना उलटला, मुख्यमंत्र्यांच्या सभेला अद्याप पोलिसांकडून परवानगी नाही

औरंगाबाद : येत्या ८ जुन रोजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणार आहे. सभेला आता अवघे सहाच दिवस शिल्लक आहेत. असे असताना देखील मुख्यमंत्र्याच्या सभेला अद्याप औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली नाहीये.  विशेष म्हणजे या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेकडून पोलिसांना अर्ज करून तब्बल एक महिना उलटला आहे. त्यामुळे ही बाब विरोधकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

तर सभेसाठी परवानगी मिळणारच असा दावा शिवसेनेकडून केल्या जात आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या याच मैदानावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी १ मे रोजी जाहीर सभा घेतली होती. आता त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी सभा होणार आहे. सभेला अवघ्या सहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र, अजूनही पोलिसांकडून या सभेला परवानगी मिळालेली नाही. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी २ मे रोजीच सभेला परवानगी मिळावी म्हणून, पोलीस आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. मात्र महिना उलटून सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळालेली नाही. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या सभेला मात्र आठ दिवसात परवानगी देण्यात आली होती.

 

Share