नवी दिल्ली : मोदी सरकारमधील अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी
केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नक्वी यांच्या राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ उद्या ७ जुलैला संपणार आहे. त्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून नक्वी यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री आरसीपी सिंग यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सादर केला आहे.
Mukhtar Abbas Naqvi resigns as Union Minister of Minority Affairs pic.twitter.com/QNdbqHtvpw
— ANI (@ANI) July 6, 2022
आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्तार अब्बास नक्वी यांच्या योगदानाचे कौतुक केले होते. भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीतून नक्वी यांचे नाव वगळण्यात आले होते. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना केंद्रीय मंत्री केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कामकाज पाहू शकतात. मात्र, त्याआधीच नक्वी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
नक्वी यांना भाजप उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ती प्रत्यक्षात उतरली नाही. दरम्यान, आता नक्वी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप रिंगणात उतरवण्याची शक्यता वाढली आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने ‘एनडीए’चे उमेदवार म्हणून नक्वी यांना उमेदवारी मिळाल्यास ‘यूपीए’च्या तुलनेत त्यांचे पारडे जड ठरू शकते. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठीच नक्वी यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.