उद्धव ठाकरेंनी प्रति ‘मातोश्री’ तयार केली; आ. भरत गोगावले यांची टीका

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ उभी केली आहे. ‘मातोश्री’ हे ठिकाण बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. उद्धव ठाकरेंनी आता प्रति ‘मातोश्री’ तयार केली आहे. त्यामुळे त्यांच्या ‘मातोश्री’वर आम्ही जाऊ शकत नाही, अशि टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आ.भरत गोगावले यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आ.भरत गोगावले यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नव्या सरकारसंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ उभी केली, तर उद्धव ठाकरेंनी त्याच्यासमोर आता नवी ‘मातोश्री’ तयार केली आहे. त्यामुळे त्यांच्या ‘मातोश्री’वर जायचे की नाही हे आमच्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला ठरवावे लागेल. बाळासाहेबांची ‘मातोश्री’ तीन मजल्यांची आहे आणि उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’ आठ मजल्यांची आहे. त्यामुळे आम्हाला आठ मजले चढता येणार नाहीत. आम्ही केवळ तीन मजले चढून जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आता बाळासाहेबांच्या विचारांची राहिलेली नाही.

शिवसेनेचे खासदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नावर बोलताना आ. गोगावले म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ब्रीदवाक्य घेऊन पुढे चाललेलो आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. स्वतः मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी हे सभागृहात सांगितले आहे. शिवसेनेचे खासदार आणि छोटे पदाधिकारी शिंदे यांच्या संपर्कात आहेत की नाही हे आम्हाला माहिती नाही, हे शिंदेंनाच माहिती आहे; परंतु खासदार राहुल शेवाळे यांनी काल जे सांगितले त्यावरून तुम्हाला कल्पना यायला पाहिजे.

संजय राऊतांमुळे आम्हाला बंडखोरी करावी लागली

संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्यापासून दुरावली आहे. संजय राऊत काय बोलत आहेत, याचे परिणाम काय होत होते हे सर्वांनाच चांगले माहिती आहे. संजय राठोड जे म्हटले आहेत, त्यात चुकीचे काही नाही. आमचे ४० जण आणि १० अपक्ष अशा ५० जणांनीदेखील हेच सांगितले आहे की, संजय राऊत यांनी काय केले आहे. संजय राऊतांमुळेच आमच्यावर बंडखोरीची वेळ आली, असा गंभीर आरोपही आ. गोगावले यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना कॉँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत युती करावी, असे सांगितले होते; पण त्यांनी ते ऐकले नाही. उद्धवसाहेब मिलिंद नार्वेकरांना यांच्याकडे चर्चेला पाठवत होते, तर तिकडे संजय राऊत तोंडाला येईल ते बोलत होते. राऊतांचे वक्तव्य काळजाला घर पाडणारे होते. राऊतांमुळेच आमचे एकेक पाऊल पुढे पडत गेले आणि शेवटी आम्ही सर्व आमदारांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला, असे आ. गोगावले यांनी सांगितले.

शिंदे गटाकडून ‘व्हिप’ न पाळल्याप्रकरणी १४ जणांच्या यादीतून आदित्य ठाकरे यांना का वगळण्यात आले, या प्रश्नावर भरत गोगावले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार १४ जणांच्या अपात्रतेच्या यादीतून आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आले आहे. आम्ही अजून सगळे काही विसरलेलो नाही.

Share