मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. येत्या ८ जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार असून, दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कार्यवाहीसाठी राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवास्थानाबाहेर पहारा दिला होता. तसेच राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी घेराव घातला होता.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात भा. दं. वि. च्या विविध कलमांतर्गत आणि कलम १२४ (अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तब्बल १२ दिवसांनी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. याच प्रकरणात मुंबईतील खार पोलिस बुधवारी (८ जून) राणा दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत.
नोटीस म्हणजे मुख्यमंत्र्यांची खेळी : रवी राणा
मुंबई पोलिसांनी दिलेल्या या नोटिशीबाबत बोलताना आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त यांनी पोलिसांमार्फत नोटीस पाठवली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही सारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची खेळी आहे, असा घणाघाती आरोप आ. रवी राणा यांनी केला आहे.
दरम्यान, येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी पाच जागांवर संबंधित पक्षांचे उमेदवार सहजपणे निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संजय पवार तर भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा निवडून आणण्यात अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आमदार रवी राणा हे राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करणार की नाही अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.