कमल हासनच्या ‘विक्रम’चा झंझावात; अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ पडला मागे

मुंबई : बॉलिवूड विरुद्ध टॉलिवूड असा वाद सुरू असताना पुन्हा एकदा टॉलिवूडच्या म्हणजे दक्षिण भारतातील चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. प्रसिद्ध अभिनेता कमल हासन, विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका असलेला ‘विक्रम’ हा चित्रपट बॉलिवूडच्या सध्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना धक्का देत कमाईच्या बाबतीत मागे टाकत आहे. कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने तीन दिवसांत भारतात १०० कोटी तर जगभरातून दीडशे कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाने दोन दिवसांत केलेली कमाई निराशाजनक असल्याचे दिसून आले आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडला टॉलिवूडने नाकीनऊ आणले आहे. टॉलिवूडचे एकाहून एक सरस असे चित्रपट प्रदर्शित होऊन त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यानंतर एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. प्रशांत नील याच्या ‘केजीएफ २’ चित्रपटाने तर बॉलिवूडच्या पायाखालची जमीनच सरकल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात आता कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. ‘विक्रम’ चित्रपटाने पुन्हा एकदा बॉलिवूडला मागे टाकले आहे.

 

कमल हासन, विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘विक्रम’ चित्रपटाबरोबरच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अभिनीत ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचबरोबर सध्या बॉक्स ऑफिसवर मेजर, विक्रम, सम्राट पृथ्वीराज, मराठी चित्रपट- सरसेनापती हंबीरराव मोहिते, हॉलिवूडचा ‘टॉप गन्स’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’च्या प्रदर्शनानंतर त्याला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. भलेही अक्षयच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटालाही वादाचा सामना करावा लागला असला तरीही त्याला फारसे यश मिळालेले नाही. ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याच्या नावावरुन वाद रंगला होता. त्यामुळे वादाचा परिणाम चित्रपटाला तारक ठरणार की मारक, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

अक्षय कुमार, सोनू सूद, संजय दत्त, मानुषी छिल्लर याशिवाय इतर मोठी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. अक्षय कुमारने गेल्या काही दिवसांपासून ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशनही केले होते. मात्र, ‘विक्रम’च्या झंझावातापुढे ‘सम्राट पृथ्वीराज’चा काही निभाव लागलेला नाही. तसे चित्र बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाबद्दल जेवढी प्रसिद्धी करण्यात आली त्या तुलनेत त्याला मिळालेला प्रतिसाद मात्र निराशाजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दहा कोटींची कमाई केली होती, तर ‘विक्रम’ची एवढी कमाई एकट्या तामिळनाडू राज्यातून होती. उर्वरित भागातून ‘विक्रम’ ने सहा कोटींहून अधिक कमाई केली. यावरून या दोन्ही चित्रपटांमधील कमाईचा फरक लक्षात येईल.

कमल हासन, विजय सेतूपती यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाले होते. त्याच्या ट्रेलरला युट्युबवर एका दिवसांत कोट्यवधी व्ह्युज होते. त्यावरून त्याची क्रेझ लक्षात येईल. ‘विक्रम’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळत असल्याचे दिसत आहे. कमाईबाबत बोलायचे झाल्यास ‘विक्रम’ या चित्रपटाने तीन दिवसांत भारतातून १०० कोटींचा तर जगभरातून १५० कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत ‘सम्राट पृथ्वीराज’ ला मिळालेले ओपनिंग फारसे वाईटही नाही. मात्र, ‘विक्रम’ च्या कमाईच्या आकड्यांसमोर ते ओपनिंग कमी आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चे यश अवलंबून आहे.

Share