मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदिल दिला आहे. आता त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ९ महानगरपालिकेंच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ५ ऑगस्टला आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर ६ ऑगस्ट २०२२ रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर ६ ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण २० ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.