औरंगाबादमध्ये खुनाचे सत्र सुरुच; पैश्यांच्या वाटणीवरुन मित्रांनीच केला अल्पवयीन मित्राचा खून

औरंगाबाद : चोरी केलेला लोखंडी पाईप विकून मिळालेल्या पैशांची वाटणी करताना झालेल्या वादानंतर आरोपींनी १६ वर्षीय सहकाऱ्याचीच हातरुमालाने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १४ मंगळवारी रोजी समोर आली आहे. युसूफ खान (वय-१६,रा.दादा कॉलोनी) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर सय्यद आमेर सय्यद सलीम वय-२१, फिरोज शेख वय-२७ ( दोन्ही रा.गल्ली क्र-७ दादा कॉलोनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनूसार, मयत आणि दोन्ही आरोपींनी दि. ११ शनिवारी रोजी एक लोखंडी पाईप चोरी केला होता. तो पाईप चौदाशे रुपयात भंगाराच्या दुकानात विकला. पैसे आल्याने तिघांनी मद्यपानाचा बेत आखला. शनिवारी १२ च्या सुमारास मोंढा नाका येथील वाईनशॉप मधून तिघांनी दारू खरेदी केली व रिक्षाने जाधववाडी येथे गेले. तेथे तिघांनी मद्यपान केले. दरम्यान, पाईप विकून मिळालेल्या पैशांची वाटणी करताना तिघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाताच आरोपींनी १६ वर्षीय युसूफचा रुमालने गळा आवळला त्यातच त्याचा मृत्यू झाला.

युसूफ मृत झाल्याचे लक्षात येताच दोघांनी त्याचा मृतदेह झुडुपात लपवला. मंगळवारी वास येत असल्याने नागरिकांनी झुडपात जाऊन पाहिले असता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास आला. याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त होताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांची ओळख पटवत आरोपींना अटक केली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरील कामगिरी पोलीस उपायुक्त दिपक गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिन्सी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे आणि सहकाऱ्यांनी यशस्वी पार पाडली.

Share