अजित पवारांच्या बोलण्याने भाजपची अडचण झाली असती – रोहित पवार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणच करू न दिल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन नाराजी व्यक्त केली आहे.

आ. रोहित पवार आपल्या ट्विट मध्ये म्हटलं की, छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही.

वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. असं म्हणत महाराष्ट्र भाजपावर टीका केलीय.

अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा! असं म्हणत भाजपाला लक्ष्य केलंय.

दरम्यान या संदर्भात भाजप नेते आशिष शेलार यांनी नरेंद्र मोदींना मोठ्या मनाने आणि दिलखुलासपणे अजित पवारांना तुम्ही भाषण करा असं सांगितलं. त्यावर अजित वार काय बोलले हे त्यांनाच माहिती. ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा मिठाचा खडा टाकणे योग्य नाही. सुप्रिया सुळेंनी थोडी माहिती घेतली असती तर हे वक्तव्य केलं नसतं असं माझं मत आहे,” असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Share