मुंबई- राज्यात महविकास आघाडी सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. करोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
किमान समान कार्यक्रमाच्या (सीएमपी) आधारे महाविकास आघाडीचे सरकार चालविण्याचे ठरले आहे. करोना संकटाचा अडसर दूर झाल्यामुळे 'सीएमपी'नुसार दलित, आदिवासी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जावी, ही अपेक्षा. pic.twitter.com/PoJL24eml5
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 30, 2022
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले म्हणतात, जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने २०१९ साली तीन पक्ष एकत्र आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालेल असे ठरलेले आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे. सोनियाजी गांधी यांनी दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठीच्या योजनांवर सरकारने काम करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना याआधीही पत्र पाठवले होते.
दरम्यान तीन वर्षापसून कोरोना काळ सुरु होता. राज्य सरकारपुढे अडचणी होत्या. पण या कठीण प्रसंगीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने चांगले काम केले आहे. आता सर्व व्यवहार सुरुळीत सुरु असून अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली आहे. आता सीएमपी व दलित, ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबाजवाणी करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी.अशी मागणा पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.