राष्ट्रवादी धक्का, जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनंतर आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला आहे.

यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांचा समावेश आहे.

याशिवाय सामजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष सरिता कांबळे, माजी शिक्षण मंडळ समिती सदस्य अजित सावंत, जिल्हा सरचिटणीस दिलीप सिंह, सामजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, शिवाजी गावडे, उपशहर अध्यक्ष राज नायर यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आपला पाठींबा जाहीर केला.

नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास मंत्री असताना अनेक निर्णय घेतले असून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे. यापुढेही नवी मुंबईतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना न्याय देऊ,’असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा, शिवसेना जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share