लम्पीबाबत गैरसमज पसरविल्यास कारवाई करणार- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : लम्पी आजाराबाबत गैरसमज पसरविल्यास तसेच लसीकरणासाठी अवास्तव पैशांची मागणी केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोरोना काळात प्रतिबंधित क्षेत्रात ज्याप्रमाणे दक्षता घेण्यात आली त्याच धर्तीवर लम्पी आजाराबाबतही काळजी घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

सिन्नर तालुक्यातील पांगरी बु. येथे भारती पवार यांनी गुरुवारी लम्पी आजाराने बाधित जनावरांची पाहणी केली. त्यावेळी डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व राज्यांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने बाधित असलेल्या जनावरांच्या साधारण ५ किलोमीटर भागातील लसीकरणावर भर देण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लम्पी आजाराबाबत सतर्कता बाळगण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले असून, त्याबाबत आवश्यक ती सर्व मदतही उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमार्फत लम्पी आजाराबाबत खबरदारी घेण्यात आली असून त्याअंतर्गत गोवंश जनावरांचे लसीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी प्रमाणात असून आतापर्यंत साधारण २४ गोवंश जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली होती. त्यातील १८ जनावरे बरी झाली आहेत, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहायक आयुक्त डॉ. बाबूराव नरवाडे, जिल्हा परिषदचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, सिन्नर प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश दुबे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश पवार, डॉ. विकास चकतर, डॉ. उर्मिला जगताप डॉक्टर सचिन वर्ते डॉ. निवृत्ती आहेर डॉ. अरविंद पवार आदी उपस्थित होते.

Share