मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल बुधवारी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना हिंमत असेल तर, काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणा, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आज खा. राणा यांनी मुख्यमंत्र्यानी काल दिलेले आव्हान स्वीकारले आहे.
काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तेथे हनुमान चालिसा पठण करणे कठीण आहे असे जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटत असेल तर, मी नक्कीच जाईन आणि काश्मीरमध्ये हनुमान चालिसा पठण करेन, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा वाचावी, असे प्रतिआव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. नवनीत राणा म्हणाल्या, ज्या दिवशी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसाचे पठण करतील त्या दिवशी मी काश्मीरमध्ये कधी आणि केव्हा हनुमान चालिसा वाचणार याची तारीख, वेळ जाहीर करेन. मुख्यमंत्री म्हणतात की, मंदिरात जाण्याची गरज नाही… हनुमान चालीसा वाचण्याची गरज नाही… मग तुम्ही हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करता, असे कसे म्हणता? असा प्रश्नही खा. राणा यांनी यावेळी उपस्थित केला.
औरंगाबादची जनता पाण्यासाठी हैराण आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या जनतेच्या समस्यांवर मुख्यमंत्री म्हणून बोलायला हवे होते; परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याचा साधा उल्लेखही केला नाही, असा घणाघात खा. राणा यांनी केला. काश्मीरमधील टार्गेट किलिंग आणि काश्मिरी पंडितांच्या हत्या या विषयी भाष्य करताना खा. नवनीत राणा म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देशातील जनतेसोबत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार योग्य ते पाऊल उचलत असून, जनतेचा आणि देशवासीयांचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास खा. राणा यांनी यावेळी व्यक्त केला.