नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध; कोर्टाचं निरीक्षण

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मुंबई विशेष न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. ईडीने मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल न्यायालयाने घेतली

विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेताना स्पष्ट केलं की, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला. ज्यातनं या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्यानं शिक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर ती भाडेपट्टी अस्लमच्याच नावावर करण्यात आली.

मलिकांच्या विरोधातील ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सरदार शहावली खानच्या साथीने गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंचा सर्व्हे केला. नवाब मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकर या दोघांसोबत अनेकदा बैठक केली. नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे एक गाळा अडवून ठेवला. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान जेलमधून पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा त्याच्यासोबतही बैठका झाल्या. गोवावाला कंपाऊंडचा अधिकाधिक भाग गिळंकृत करण्यासाठी नवाब मलिकांनी बेकायदेशीर भाडेकरू घुसवले. हसीना पारकरने सलीम पटेलच्या साथीने गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवला अशी कबुली हसीनाच्या मुलाने दिली आहे. त्यानंतर कालांतराने ही सर्व मालमत्ता नवाब मलिक यांना विक्री करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आपल्या चार्जशिटमध्ये 17 जणांना साक्षीदार केलं आहे. या दोषारोपपत्राची दखल घेत स्पेशल कोर्टाने नवाब मलिक आणि 1993 बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाहवली खान या दोघांच्या विरोधात कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Share