कोरोनानंतर आता जगभरात ‘मंकीपॉक्स’चे थैमान; भारत सरकारही ‘अलर्ट’

नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. युरोपमधील अनेक देश या विषाणूच्या संसर्गामुळे हैराण झाले आहेत. ‘मंकीपॉक्स’ ला जागतिक महामारी घोषित करण्याबाबत विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही सावध झाले असून, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना एनआयव्ही आणि आयसीएमआरला दिल्या आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून यूनायटेड किंगडम, स्पेन, बेल्जियम, इटली, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह जगभरातील अनेक देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनच्या आरोग्य विभागानुसार, नुकतीच नायजेरियाहून आलेल्या एका नागरिकाला इंग्लंडमध्ये ‘मंकीपॉक्स’ची लागण झाल्याचे प्रकरण ७ मे रोजी समोर आले होते. १८ मे रोजी यूएस मॅसाचुसेट्स डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थने कॅनडा देशातून आलेल्या एका पुरुषाला ‘मंकीपॉक्स’ विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट केले होते.

ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समध्ये ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या पहिल्या दोन प्रकरणांचा खुलासा झाला आहे. तर पेरूमध्ये याबाबत अलर्ट केला आहे. ऑस्टेलियातील राज्य न्यू साउथ वेल्समध्ये शुक्रवारी ‘मंकीपॉक्स’चे रुग्ण आढळले आहेत. त्याचा प्रसार हळूहळू यूरोपमध्ये होत आहे. कोरोना विषाणूच्या धोक्यापासून अजूनही जनजीवन पूर्ववत सुरू झाले नसताना आता धोकादायक ‘मंकीपॉक्स’ आढळून आल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट अद्याप दूर झालेले नसतानाच आता आणखी ‘मंकीपॉक्स’ विषाणूने संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि अमेरिकेत या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. तसेच कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समध्ये ‘मंकीपॉक्स’ सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांचा मृत्यूदर १० टक्क्यांपर्यंत असण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ‘मंकीपॉक्स’ प्रादुर्भावाची स्थिती जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही आपत्कालीन बैठक बोलावली आहे. भारतात या विषाणूचा शिरकाव होण्याआधीच केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मंकीपॉक्स’ चा वेगाने प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट झाले असून,
‘मंकीपॉक्स’ चे रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवावे, प्रवासी आजारी असल्यास त्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवावेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्या आहेत. सद्य:स्थितीत विमानतळ आणि बंदरांवरील आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ मात्र धोकादायक आजार आहे. सुरुवातीला संक्रमित रुग्णाला ताप येतो त्यानंतर लिम्फ नोड्स सुजल्यासारखे दिसतात. या आजाराने चेहरा आणि शरीरावर गाठी येतात. हा आजार २ ते ४ आठवड्यात पूर्ण बरा होतो. दरम्यान या विषाणूचा प्रसार लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत नाही.

काय आहेत ‘मंकीपॉक्स’ रोगाची लक्षणे?
१) स्नायूंमध्ये वेदना आणि थंडी वाजून येणे
२) ताप, अंगावर पुरळ येणे
३) सातत्याने थकवा जाणवणे
४) तीव्र ताप आणि न्यूमोनिया होणे
५) शरीरावर गडद लाल ठिपके येणे
६) डोकेदुखीचा त्रास होणे

Share