पवारांच्या कौतुकाला राष्ट्रवादीचा प्रतिप्रश्न

मुंबई : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षावर जोरदार टिका केली. देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. तर दुसरी कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कौतुक केले. शरद पवार यांचे कौतुक केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मोदीजी ‘पीएम केअर फंड’ गेला कुठे?’ असा प्रश्न विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लोकसभेत बोलत असताना कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि स्थलांतरीत कामगारांना दोषी ठरवले होते. मात्र याच मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक ट्रेनची सुविधा दिली होती. त्यासाठी एक हजार कोटी खर्च करण्यात आले असल्याचे केंद्राकडूनच सांगितले जात असेल तर मोदीजी महाराष्ट्राला कसे जबाबदार धरू शकतात? ही दुटप्पी भूमिका कशासाठी याचे उत्तर मोदींनी देणे गरजेचे आहे, तसेच पीएम केअर फंडमधील बाकी रकमेचे काय झाले याचे उत्तरही त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम केअर फंड’ कोरोनाचा उद्रेक सुरु झाल्यानंतर मोठा गाजावाजा सुरू केला. कोविडसारखे आकस्मिक संकट कोसळल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा फंड खर्च करण्यात येईल, असे हा फंड सुरु करताना सांगण्यात आले. पीएम इंडिया या वेबसाईटवर देखील हाच उद्देश अजूनही लिहिलेला आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही गंभीर प्रश्न विचारण्याची गरज आहे. पीएम केअर फंडमध्ये २०२०-२१ या वर्षात १०,९९० कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे. त्यापैकी केवळ ३ हजार ९७६ कोटी इतकीच रक्कम वितरीत झाल्याचे ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे. १,३११ कोटी हे व्हेंटिलेटर्स बनविण्यासाठी खर्च करण्यात आले. मात्र हे व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतः औरंगाबाद येथील रुग्णालयात या निकृष्ट व्हेंटिलेटरचा पर्दाफाश केला होता. याशिवाय सुमारे २०० कोटी कोविड हॉस्पिटल्स, बेड, ऑक्सीजन प्लाण्ट आदींसाठी खर्च केले गेले. तसेच एक हजार कोटी हे स्थलांतरीत मजुरांच्या सोयी सुविधांसाठी खर्च करण्यात आले आहेत.
Share