ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे फडणवीसांचे कटकारस्थान – मलिक

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे, परंतु केंद्रातील सरकारही आम्ही ताब्यात घेऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला आहे.

राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडीचा लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्यामागेही लावत आहेत. भापला वाटतंय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील हा भाजपचा गैरसमज आहे.’ असंही मलिक म्हणाले.

ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कटकारस्थान असून प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी (ED) कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्‍यांना करत असल्याने देवेंद्र फडणवीस यांना ईडीचा ओएसडी करुन टाका अशी मागणी केंद्र सरकारकडे नवाब मलिक यांनी केली आहे.

ईडीच्या माध्यमातून भीती निर्माण करुन सत्ता काबीज करता येणार नाही. हे महाराष्ट्र आहे. पवारसाहेबांना नोटीस दिल्यानंतर तुमची काय परिस्थिती झाली होती हे राज्याने पाहिले होते. त्यामुळे तुम्ही जितका केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारला दाबण्याचा प्रयत्न करणार तितक्या ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत राहिल असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

Share