नवी दिल्ली : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्चपदी आदिवासी समाजातून आलेल्या महिलेस विराजमान होण्याची ही पहिली घटना ठरण्याची शक्यता आहे.
कोण आहेत द्रोपदी मुर्मू?
एनडीएचे उमेदवार मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात झाला. द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेविका म्हणून केली. नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या. २०१३ मध्ये त्या पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदावर पोहोचल्या. तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू ओडिशात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात २०००-२००२ पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह ६ ऑगस्ट २००२ ते मे पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.
Delhi | NDA's Presidential candidate Droupadi Murmu files her nomination in the presence of PM Modi, Union cabinet ministers & CMs of BJP & NDA ruled states, at Parliament building
(Source: DD) pic.twitter.com/Ko1kxl3meJ
— ANI (@ANI) June 24, 2022
द्रौपदी मुर्मू या २०००आणि २००४ मध्ये ओडिशाच्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे २०१५ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्या त्या पहिल्या महिला आहेत. तसेच राज्यपालपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या आहेत. दरम्यान, निवडून आल्यानंतर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. याशिवाय त्या ओडिशातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपतीही असतील. राजकारण आणि समाजसेवेत त्यांनी जवळपास दोन दशके काम केलं आहे.