नागपूर : सध्याचे भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंदराव नरवणे येत्या ३० एप्रिल रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या जागी सध्याचे उपलष्करप्रमुख व मूळचे नागपूरकर असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ३७ वर्षांपासून सैन्यात सेवारत असणारे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करात सर्वांत वरिष्ठ आहेत. पांडे हे मूळचे नागपूर येथील असून, त्यांची जानेवारी महिन्यात उपलष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. मनोज पांडे हे नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख तथा ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पांडे आणि नागपूर आकाशवाणीच्या उद्घोषिका प्रेमा पांडे यांचे ते सुपुत्र आहेत. पांडे यांचे लहान बंधू संकेत पांडे हे लष्करात कर्नल होते. सर्वांत लहान बंधू डॉ. केतन पांडे हे ब्रुनोईच्या राजाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी होते.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरस्थित वायुसेनानगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावीनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीत दाखल झाले. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. कॅम्बर्ली (ब्रिटन) स्टाफ कॉलेज, महूचे आर्मी वॉर कॉलेज, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी ‘हायर कमांड कोर्स’ केला आहे. मनोज पांडे यांनी लष्करात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. लष्कराचे दक्षिण मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांड सेंटरचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या सोबतच लष्कराच्या इस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.