कारवाई करायला माझे घर दिसते, बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाजवळ काही बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्याकडे कानाडोळा करून माझ्या बंगल्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. यांना कारवाई करायला माझे घर दिसते, बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात आला आहे. सीआरझेड-२ मध्ये अंतर्गत केलेल्या बांधकामाबद्दल कोणतीही माहिती पालिकेला सादर केली नाही. कागदपत्रांमध्ये वाढीव बांधकामाचा उल्लेख नाही. यासोबतच वाढीव बांधकाम नियमित करण्यासाठी योग्य कागदपत्रे पुरावे जोडलेले नाहीत, असे महापालिकेचे म्हणणे आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी महापालिकेने शेवटची संधी म्हणून राणे यांना १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. १५ दिवसांत योग्य कागदपत्रे सादर न केल्यास महापालिका या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज (सोमवार) हल्लाबोल केला.
सूडभावनेतून माझ्या बंगल्यावर कारवाई
राणे म्हणाले, जुहू येथील ‘अधिश’ बंगल्यावर सूडभावनेतून कारवाई करण्यात येत आहे. ‘मातोश्री’जवळ काही बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून माझ्या बंगल्यावर कारवाई केली जात आहे; परंतु माझा न्यायालयावर विश्वास आहे. राज्याला मुख्यमंत्री कुठे आहे ? असा सवाल करत, अनेक दिवसानंतर मंत्रालयात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांचा कारभार केवळ दोन दिवसांत उरकला. राज्य दिवाळखोरीत चाललेय, राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा जरब नाही. मुख्यमंत्री कट्ट्यावरची भाषणे विधानसभेत करतात, याची मला लाज वाटते, अशी टीका त्यांनी केली. ‘ईडी’च्या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊतांचा तोल ढळलाय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका राणे यांनी केली. बाळासाहेबांची तुलना कुणाशी करणार नाही, असेही त्यांनी एका प्रश्नावर उत्तर दिले.

हिंदुत्वाशी गद्दारी करून फक्त खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरला. बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही; पण गेल्या दोन वर्षात शिवसेना पक्षप्रमुखांनी हिंदुत्वाच्या संबंधी कशा भूमिका घेतल्या, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. माझ्या घरासंबंधी माझ्यावर कायदेशीर कारवाई केली गेली नाही. ही कारवाई फक्त राजकारणासाठी केली गेली. आयुक्तांना फक्त माझेच एकट्याचे घर दिसतेय. इतर ठिकाणी ते डोळे झाकून फिरतात. ते मुख्यमंत्रीही तसेच… सूड म्हणून ही कारवाई होत आहे; पण अशा कारवायांना मी भीक घालत नाही. आम्ही मैदानात लढणारे आहोत. कारवाया करून आम्ही शांत बसू, असे त्यांना वाटत आहे; पण त्यांचा तो गैरसमज आहे. माझ्याकडे अनेकांचे रेकॉर्ड आहेत, वेळ आली की उघडे करेन, असा इशाराही राणे यांनी दिला.


राज ठाकरेंच्या भूमिकेला नारायण राणेंचा पाठिंबा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अनधिकृत भोंगे हटाव भूमिकेला नारायण राणे यांनी पाठिंबा दर्शवला. राज ठाकरे यांच्या भूमिकेला मी समर्थन दर्शवतो. बेकायदेशीर भोंग्यांना आमचा विरोध आहे. जर कारवाई करायला माझे घर दिसते तर मग बेकायदेशीर भोंगे दिसत नाहीत का?, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवरील भोंगे काढण्यास ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, बेकायदेशीर भोंगे मशिदीवर का ठेवले आहेत. यावरून दंगली भडकल्या, तर ते आवरण्याची सरकारकडे ताकद नाही. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. दिलीप वळसे-पाटील गृहखाते सांभाळू शकत नाही. आदित्य ठाकरे पिकनिकसाठी अयोध्या दौऱ्यावर जातील, अशी खिल्ली राणे यांनी उडवली.

Share