ई-पीक पाहणीचे नविन सुविधायुक्त ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

ठाणे : शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे आणि सुलभ व्हावे यासाठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये महत्वाचे बदल करून या ॲपची सुधारित आवृत्ती २ विकसित करण्यात आली आहे. हे सुधारित मोबाईल ॲप १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबीत होतील.

कसे असेल हे ॲप?

सुधारित मोबाईल ॲपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकरी  ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील, त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासू दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबईल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंघोषणापत्र घेतले जाणार असून, शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबीत होणार आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये ‘मदत’ हे बटन देण्यात आलेले आहे. त्याला क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. याचा वापर करून शेतकरी ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील. प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई- पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

खरीप हंगामातील पीक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन 

ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीकविमा व पीकविमा दावे निकाली काढण्यासाठी, पीककर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे आदी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत. खरीप हंगाम २०२२च्या पीक पाहणीची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली आहे. त्यासाठी सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप सुधारीत आवृत्ती-२ गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व शेतकऱ्यांनी ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.

ॲपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये एकदा दुरुस्त करता येईल

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजने अंतर्गत येणाऱ्या पिकाची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्याची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून, त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत अशा शेतकऱ्याची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. या पूर्वीच्या मोबाइल ॲपमध्ये असलेल्या मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याच्या सुविधेऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकाचा लागवडीचा दिनांक, हगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकाची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Share