राज्यपालांचा मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा – रोहित पवार

मुंबई : राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वींचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचे. पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार आपल्या ट्टिट मध्ये म्हणतात, राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

 

आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे, असंही रोहित पवार म्हणालेत.

Share