ऐतिहासिक दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा.गवई होत्या. केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थिती होते. तर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई प्रकृती अस्वास्थामुळे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
३० लक्ष नागरिकांचे अभिवादन
ऐतिहासिक दीक्षाभूमीवर ६६ वर्षांपूर्वी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसरा सणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे होतो. देश-विदेशातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. यावर्षीही गेल्या ३ दिवसात जवळपास ३० लक्ष नागरिकांनी याठिकाणी अभिवादन केले. पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी केलेली गर्दी लक्षणीय होती.
‘अ’ दर्जासाठी पाठपुरावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते महापौर असतानापासून दीक्षाभूमीच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारकडून दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच्या धार्मिक स्थळाची मान्यता प्रलंबित असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामदास आठवले यांच्यासह आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१९० कोटींचा आराखडा
दीक्षाभूमीच्या विकासासाठी यापूर्वी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी ४० कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासकडे जमा असून ६० कोटी रुपये देण्याची राज्य शासनाची तयारी होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये पाठपुराव्या अभावी दीक्षाभूमी आराखडा रखडला. आता पुढील पंधरा दिवसात सुधारित १९० कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल, तसेच केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या बाबींसाठी पाठपुरावा देखील केला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
इंदू मिल येथे अद्यावत स्मारक
इंदू मिल येथे उभारल्या जात असलेल्या विश्वस्तरीय २४०० कोटी किमतीच्या इंदू मिल जमिनीचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोडवल्याचा अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच २०२४ मध्ये इंदू मिल येथे अद्यावत स्मारक उभे राहणार असून सी लिंक वरून जाणाऱ्या प्रत्येकाला त्याचे दर्शन घ्यावेच लागेल, अशा पद्धतीची रचना या स्मारकाची करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पाठपुराव्याची माहिती
लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना ते ज्या निवासस्थानात राहत होते. त्या निवासस्थानाला स्मारकामध्ये रुपांतरण, जपानमध्ये विद्यापीठात बाबासाहेबांच्या पुतळ्याची उभारणी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. तेथील कुलगुरूंनी बाबासाहेबांचा प्रबंध आजही संदर्भासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.