भाजपने कितीही दावे केले तरी मविआचे चारही उमेदवार निवडून येतील – जयंत पाटील

मुंबई : भाजपने कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आज राज्यसभेसाठी मतदान होत असून विधानभवनात जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपील केले आहे. निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा अशी अपेक्षा आहे” असेही जयंत पाटील म्हणाले, सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक आज होत असून महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, राज्यसभा निवडणूक मतदानाला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदान केले. महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल.
Share