अमिताभ बच्चन यांचा ‘ब्रम्हास्त्र’मधील लूक प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली असली तरी ते आजही चित्रपटांमध्ये तितक्याच जिद्दीने काम करत आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात मोठी गर्दी करतात. आता अमिताभ बच्चन यांचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटात त्यांची कोणती भूमिका असणार, त्यांचा लूक कसा असणार? याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकता संपली असून, ‘ब्रम्हास्त्र’ मधील अमिताभ बच्चन यांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/Cek3nBerxNN/?utm_source=ig_web_copy_link

धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ‘ब्रम्हास्त्र’मधील अमिताभ बच्चन यांचा रुपेरी पडद्यावर कधी न पाहिलेला लूक दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखम दिसत आहे. त्यांच्या हातात तलवार आहे. तसेच त्यांची नजर समोरच्याला थक्क करणारी आहे. “गुरू है गंगा ज्ञान की काटे भाव का पाश, गुरू उठा ले अस्त्र जब करे पाप का नाश” अशी कॅप्शन धर्मा प्रॉडक्शनने हा व्हिडीओ शेअर करताना दिली आहे.

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात अमिताभ बच्चन हे गुरूची व्यक्तिरेखा साकारत असून, या व्हिडीओ आणि फोटोवरून त्यांची ही भूमिका जबरदस्त असल्याचे जाणवते. त्यांच्या चेहऱ्यावर एक खूणही आहे. अमिताभ बच्चन यांचा हा लूक निर्माता करण जोहर, अयान मुखर्जी, आलिया भट्ट, रणबीर कपूर या सगळ्यांनी शेअर केला आहे. निर्माता करण जोहरने हा लूक ट्विट करून लिहिले आहे की, ”गुरू आहे ज्ञानाची गंगा. अस्त्र उचलून गुरू पापाचा नाश करतो. एक असा प्रकाश, जो अंधारावर मात करतो. तो गुरू आहे. हा बुद्धिमान गुरू प्रकाशाच्या तलवारीला पकडतो.”

अमिताभ बच्चन यांच्या या लूकला काही मिनिटांमध्येच नेटकऱ्यांची भरभरून पसंती मिळाली आहे. अमिताभ यांचा लूक पाहून आम्ही या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहोत, असे चाहत्यांनी कमेंट करत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरलाही प्रेक्षकांना पसंती दिली होती. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच नागार्जुन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबर रोजी हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेमध्ये सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा ट्रेलर १५ जूनला रिलीज होणार आहे.

‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट तीन भागात येणार आहे. ९ सप्टेंबरला पहिला भाग रिलीज होणार आहे. यात शाहरुख खानप्रमाणे करण जोहरचीही झलक पाहायला मिळणार आहे. पाच वर्षांपूर्वी अयान मुखर्जी याने दिग्दर्शक म्हणून ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. कोरोनाच्या संकटामुळे या सिनेमाच्या शूटिंगला तसा वेळ लागला. मात्र, काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा शेवटच्या सीनचे शूट पूर्ण झाले आहे. या चित्रपटाशी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे एक खास असे नाते आहे. रणबीर आणि आलिया हे याच सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. इथेच त्यांची मनं जुळली आणि शेवटी ते लग्नाच्या बंधनात अडकले.

Share