कितीही गोंधळ घातला तरी मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाहीच

मुंबई : विरोधकांनी कितीही गोधंळ घातला तरी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. आणि आताही करतो असे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्र  जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.

मंत्री जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

विरोधकांना आवाहन

विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. पण ते नेहमीप्रमाणे चहापानाच्या कार्यक्रमाला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.

आर्यनला फसवण्यात आल्याचं एसआयटी रिपोर्टवरुन स्पष्ट

शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असेही जयंत पाटील म्हणाले. नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीची तयारी

दरम्यान  या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक आदरणीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

Share