तुमचं जेवढं वय आहे तेवढं शरद पवारांच काम अजित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा राज्याच्या राजकारणात ऐरणीवर आणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रावादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टिका केली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं जेवढं वय आहे तेवढं शरद पवार यांचे काम आहे. नकला करुन पोट भरत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, माणसांचे संसार उभे करायला डोकं लागतं. अक्कल लागते. धुडगूस आणि तोडमोड करायला अक्कल लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या श्वासात आहेत. हृदयात आहेत. ध्यासात आहेत, आमच्या नसानसात आहेत. कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल? त्यांना महाराज समजलेच नाहीत. यापुढे असेच वागले तर त्यांना कधीच समाजणार नाही. केवळ दुकानदारी चालविण्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव घेत आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी समाचार घेतला.

ही सगळी नौटंकी आहे. याची नक्कल कर, पवारसाहेबांची कर, भुजबळांची नक्कल कर तर कधी माझी नक्कल कर, जयंत पाटलांची नक्कल कर. यायला, नक्कलाकार आहेत की भाषण करायला आले आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला.

राज ठाकरे शरद पवारांबद्दल काय म्हणाले?

औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळावरील मैदानावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात शरद पवार यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याच्या अलिकडेच दिलेल्या टोल्याला उत्तर देत केली. प्रबोधनकारांच्या पुस्तकातील संदर्भ सांगत त्यांनी पवार हे सोयीचे प्रबोधनकार सांगातात. खरे ख्रिश्चन मिशनरींच्या विरोधात हिंदूमशनरी सुरू करणारे ते पहिले होते. त्यांनी धर्मातील अनेक चुकीच्या बाबीवर लिहून ठेवले आहे. पण सोयीने तेवढे पवार सांगातात असे ते म्हणाले. जेम्स लेन प्रकरण पुढे करुन शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांना खरे तर शरद पवार यांना हिंदू शब्दांचीच अलर्जी असल्याची टीका केली. त्यांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे. आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व द्वेष वाढल्याच्या अरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

Share