राज ठाकरेंचे वक्तव्य चुकीचे; त्यांनी अभ्यास करावा : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वक्तव्य इतिहासाला धरून नाही. राज ठाकरेंनी अभ्यास करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, हे त्यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. इतिहास ज्यावेळी आपण मांडतो, त्यावेळी त्यातील १०० टक्के माहीत असेल तरच आपण बोलले पाहिजे. नाही तर त्याला हातसुद्धा लावू नये, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यानिमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ गेले. त्यांनी पूजा केली. त्यामुळे समाधी कुणी बांधली याचे श्रेय कुणा एका व्यक्तीचे नसून सर्व शिवभक्तांचे आहे. मी इतकेच सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी बांधलेली नाही. महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा आणि सर्व महापुरुषांचा आहे.आज महाराष्ट्रात बेकारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत, त्यावर लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे. त्याच त्याच विषयांवर किती बोलायचे.

आपला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यामुळे पुढे राजकीय प्रवास कसा असेल, या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, राजकारण मला लागू नव्हते; पण इथून पुढे राजकारणात उतरायचे आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मी रमतो. दोन्हीकडे माझा संपर्क वाढलेला आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही डोळ्यांसमोर ठेवून राजकारणात सक्रिय होणार आहे, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.

Share