कोल्हापूर : सध्या राज्यात सुरू असलेल्या कोणत्याही राजकीय घडामोडींशी भाजपचा संबंध नाही. भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आमची १३ जणांची कमिटी आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करून सांगतो, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची निर्माण झालेली शक्यता याविषयी विचारले असता, चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील घडामोडींशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. देशात राष्ट्रीय पक्ष खूप आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे कोणत्या राष्ट्रीय पक्षाबद्दल बोलत आहेत, हे आम्हाला ठाऊक नाही. राज्यात सध्या ज्या राजकीय उलथापालथी होत आहेत, त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही, या गोष्टींबद्दल मी अनभिज्ञ आहे, असे म्हणत पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोंडीवर भाष्य करत तटस्थ भूमिका घेतली. सत्ता परिवर्तनाबद्दल मला काहीही माहिती नाही, असेही ते म्हणाले.
राजकीय घडामोडींबद्दल मला फार माहिती नाही
मी काल मुंबईतील कार्यक्रमात होतो. आज आई आजारी आहे म्हणून कोल्हापूरला आलो आहे. उद्या पुण्यातील कार्यक्रमासाठी जाणार आहे, त्यानंतर शिर्डीला जाईन. त्यामुळे मी माझे रुटीन कामच करत आहे. राज्यात काय चाललेय त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. अधूनमधून मी टीव्ही पाहतो, यापलीकडे राजकीय घडामोडींबद्दल मला फार माहिती नाही. देवेंद्र फडणवीस हेदेखील नेहमीप्रमाणे दिल्लीला गेले होते. दिल्लीत कार्यकर्त्यांची काही कामे असतात, केंद्रीय नेत्यांशी चर्चा करायची असते. काल देवेंद्र फडणवीस आणि मी मुंबईत जेवणासाठी एकत्र भेटलो होतो. त्यावेळी आमच्यात सविस्तर चर्चा झाली. जर राज्यातील घडामोडींमध्ये भाजपचा संबंध असता आणि इतकेच महत्त्वाचे असते तर देवेंद्र फडणवीस यांनी मला मुंबईतच थांबवून घेतले असते, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्ती स्वातंत्र्य
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी भाजपचा कोणताही संबंध नाही. भाजपचे नेते आपली दररोजची कामे करत आहेत. मात्र, शरद पवार आणि संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करत आहेत. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; परंतु शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेविषयी विचारले असता, पाटील म्हणाले, मला शरद पवार किंवा नारायण राणे नेमके काय म्हणाले, हे माहिती नाही. भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मीच मांडतो; पण इतर नेत्यांनाही उत्तर देण्याचे अधिकार आहेत.
मोहित कंबोज यांचे सगळ्याच पक्षात मित्र
मोहित कंबोज सगळ्यांचाच मित्र आहे. तो एकनाथ शिंदे यांचादेखील मित्र आहे. मोहित कंबोज तिकडे गुवाहाटीला गेल्याबद्दल मला काही माहिती नाही. त्यांचे सगळ्याच पक्षात मित्र आहेत. संजय राऊत यांना नेमके काय म्हणायचे ते मला माहिती नाही. ते सकाळी एक बोलतात अन् दुपारी वेगळेच म्हणतात, असेही पाटील म्हणाले. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर लोकांना खूप आनंद झाला आहे. गावोगावचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला येत आहेत. अपक्ष आमदार जे आमच्याबरोबर आहेत, त्यांच्यावर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत दबाव आला असल्याचे पाटील म्हणाले. मला जे सांगायचे ते मी लगेच सांगतो. एवढा वेळ लावत नाही; पण काहीतरी चाललेय, असेही पाटील म्हणाले.