संजय राऊतांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकादा कोर्टाने झटका दिला आहे.  राऊतांना आज जामीन मिळेल, अशी शक्यता असताना कोर्टाने पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. ४ ऑक्टोंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची आज न्यायालयाने दखल घेतली. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असं संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आज ही प्रत देऊ असं ईडीने सांगितलं. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. 

काय आहे प्रकरण ?

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यावेळी प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला.

एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर आहे.

मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती.

Share