औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणारच. चिल्लर संघटनांना कितीही विरोध करू द्या, आम्ही त्यांना घाबरत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. अशा शब्दात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी विरोधकांना सुनावले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज ठाकरे यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे, प्रकाश महाजन यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. राज ठाकरेंच्या सभेला चार ते पाच संघटनांनी विरोध केला आहे. पोलिसांकडे तशा मागण्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलतांना धोत्रे म्हणाले, औरंगाबादमध्ये आतापर्यंत कोणाचीही झाली नसेल एवढी प्रचंड जाहीर सभा राज ठाकरे यांची होईल. सभेला अनेक चिल्लर संघटना विरोध करीत आहेत, पोलिस आयुक्तांना निवदेन देत आहेत, पण अशा चिल्लर संघटनाकडे आम्ही लक्ष देत नाही. विरोध करणाऱ्यांनी विरोध करून दाखवावा, आमच्यात किती दम आहे ते आम्हीसुद्धा दाखवून देऊ, असा इशाराही धोत्रे यांनी यावेळी दिला.