पोलखोल होतेय म्हणून ‘ते’ अस्वस्थ होऊन हल्ले करताहेत

नागपूर : भाजपने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडण्यासाठी पोलखोल अभियान सुरू केले आहे. ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत. अस्वस्थ होऊन ‘ते’ हल्ले करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. पोलिसांनी याप्रकरणी निष्पक्ष कारवाई करावी. पोलिसांनी दोषींना संरक्षण देण्याचे काम केल्यास त्यांचीही पोलखोल करू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

चेंबूर येथे भाजपच्या पोलखोल यात्रेतील प्रचार रथाची व कांदिवलीमधील पोलखोल सभेच्या स्टेजची शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोड प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यासाठी भाजपने पोलखोल अभियान सुरू केले आहे. या पोलखोल अभियानामुळे सत्ताधाऱ्यांना धास्ती भरली आहे. त्यामुळे भाजपच्या रथावर व स्टेजवर हल्ला करण्यात आला, असा आरोप करून फडणवीस म्हणाले, पोलखोल आम्ही रोज करतोय. ही पोलखोल कोणी कितीही विरोध केला तरी थांबणार नाही.

संजय राऊतांनी कितीही नागपूर दौरे करावे, आम्हाला फरक पडणार नाही!
शिवसेना नेते खा. संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर हा हिंदुत्वाचा गड असल्याने शिवसेनेचा झेंडा येथे घट्ट रोवायचा आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांनी कितीही नागपूर दौरे केले तरी काहीही फरक पडणार नाही. नागपूरमध्ये भाजप भक्कम स्थितीत आहे. राऊत हे वारंवार नागपुरात आले तर त्यांना सुबुद्धी येईल, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.

अमरावतीमध्ये इंग्रजांचे राज्य
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर दंगलप्रकरणी भाष्य करताना फडणवीस म्हणाले, अमरावतीमध्ये इंग्रजांचे राज्य असल्यासारखी स्थिती आहे. अचलपूर दंगलीनंतर करण्यात येत असलेल्या पोलिसांच्या कारवाईवरही फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दंगलीनंतर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सरकारकडून केले जात आहे. पोलिसांनी जात-धर्म न पाहता दोषींवर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने कालच १४ पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदलीचे आदेश दिले होते. या निर्णयाला १२ तास उलटन्याच्या आतच ५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यावरून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. अवघ्या १२ तासांत बदल्यांना स्थगिती का दिली, असा सवाल त्यांनी आघाडी सरकारला विचारला. या बदल्यांना स्थगिती देण्यामागे वसुली रॅकेटचा हात आहे का, हेदेखील सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Share