शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक

अहमदाबाद : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाच्या प्रवक्त्यांना शिवलिंगावर भाष्य करणे चांगलेच महागात पडले आहे. शिवलिंगाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याच्या कारणावरून एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि नेते दानिश कुरेशी यांना अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रँचने अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नुकतेच वाराणसी सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी हिंदू पक्षाने ज्ञानवापी मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा केला होता. यानंतर न्यायालयाने ही जागा सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा मुस्लिम पक्ष सातत्याने फेटाळत आहे. ते शिवलिंग नसून कारंजे आहे. जे जवळपास प्रत्येक मशिदीत बसवले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे हिंदू पक्षाने ज्ञानवापी मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. हिंदू पक्षाच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ अनेक लोक पोस्ट लिहित आहेत. दुसरीकडे या दाव्यालाही अनेक जण विरोध करत आहेत. यावेळी आक्षेपार्ह कमेंटही केल्या जात आहेत. अशीच कमेंट एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी लिहिली होती. दानिश कुरेशी यांनी सोशल मीडियावर शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यानंतर विश्व हिंदू परिषदेने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दानिश कुरेशी यांना अटक केली आहे.

Share