ओमप्रकाश चौटालांच्या अडचणी वाढल्या; बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी न्यायालयाने ठरवले दोषी

नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दोषी ठरवले आहे. आता चौटाला यांना न्यायालय २६ मे रोजी शिक्षा सुनावणार आहे.

ओमप्रकाश चौटाला हे भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत देवीलाल यांचे पुत्र आहेत. चौटाला यांचे भाऊ प्रताप सिंह यांच्या तक्रारीवरून १७ जानेवारी १९९७ रोजी सदर डबवाली पोलिस ठाण्यात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु तपासानंतर या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. दरम्यान, १९९३ ते २००६ मध्ये उत्पन्नापेक्षा ६.९ कोटी रुपये अधिक जमवल्याचा आरोप ओमप्रकाश चौटाला यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात सीबीआयने २००६ मध्ये ओमप्रकाश चौटाला यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर २०१० मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. सीबीआयने १०६ साक्षीदार हजर केले आणि साक्ष पूर्ण करण्यासाठी सुमारे सात वर्षे लागली. आरोपपत्रानंतर सात वर्षांनी १६ जानेवारी २०१८ रोजी चौटाला यांचा जबाब नोंदवला गेला. २०१९ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौटाला यांची ३ कोटी ६८ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरसा येथील आहेत. चौटाला यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्यमंत्री असताना ओमप्रकाश चौटाला यांनी १९९९ ते २००० या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार शिक्षकांची भरती केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने ओमप्रकाश चौटाला यांच्यासह त्यांचा मुलगा अजय चौटाला व इतर ५३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ६ जून २००८ मध्ये विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. १६ जानेवारी २०१३ रोजी चौटाला यांच्यासह त्यांचा मुलगा अजय चौटाला व इतर ५३ जणांना न्यायालयाने दोषी ठरविले होते.

२२ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी २ जुलैला चौटाला आपली शिक्षा पूर्ण करून दिल्लीच्या तिहार तुरुंगातून बाहेर आले होते. आता बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ओमप्रकाश चौटाला यांना दिल्लीतील राऊज अवेन्यू कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालय २६ मे रोजी शिक्षा सुनावणार आहे. शिक्षक भरती प्रकरणात १० वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणात चौटाला यांना पुन्हा तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांपासून ते सर्वसामान्य जनतेच्या नजरा न्यायालयाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

Share