मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर;अमित ठाकरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नवीन जवाबदारी देण्यात आली आहे. आज मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

आज सकाळी मनसेच्या मुंबईतील राजगड या मध्यवर्ती कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध करुन या संदर्भातील घोषणा केली आहे. आज मराठी भाषा गौरव दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे, असे या पत्रकात म्हटलं आहे. या निवडीमुळे पुढच्या काळात अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिक सक्रिय झालेलेे दिसू शकतात.

गेल्या काही दिवसापासून अमित हे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. अलीकडेच अमित यांनी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पक्षाच्या अनेक शाखांमध्ये जाऊन त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. अमित यांच्याभोवती असलेल्या वलयामुळे ते सातत्याने चर्चेचा विषयही असतात. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रुपाने अमित ठाकरे यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे आता अमित हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची धुरा कशाप्रकारे सांभाळतात, हे पाहावे लागेल.

कोण आहेत अमित ठाकरे?

अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. अमित ठाकरेंच्या रुपाने ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. अमित ठाकरे हे फुटबॉलप्रेमी आहेत. मुंबईतील फुटबॉल इव्हेंटला रोनाल्डिन्होसारखे खेळाडू आले होते. त्यावेळी अमित त्या खेळाडूंना आवर्जुन भेटले होते. राज ठाकरे हे व्यंगचित्रकार आहेत. अमित ठाकरे यांच्या हातातही रेषांची कला आहे. ते व्यंगचित्रकार नसले तरी, त्यांनी अर्कचित्रे काढली आहेत.

Share