वीज पुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश- ऊर्जामंत्री

मुंबई :  दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वत: ऊर्जामंत्री राऊत यांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी  सतत संपर्कात होते.

या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांची सतत संपर्कात होतो. वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी मी त्यांना सुचना दिल्या आणि या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अदिकाऱ्यांशी ही प्रत्यक्ष बोलून वीजपुरवठा तात्काळ सुरु होण्याबाबत चर्चा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सुचना दिल्या. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करुन अवघ्या ७० मिनिटात दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. असे राऊत यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल मी घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल असेही राऊत यांनी जाहीर केले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिल्याने माध्यम  माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यास विलंब झाला,असेही त्यांनी म्हटले आहे.

Share