राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य

औरंगाबादः  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलन औरंगाबादमध्ये काल आयोजीत केला होता. त्याला राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले?
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.” औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे की, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. शक्तीची सर्वत्र पूजा होते. वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असेही ते म्हणाले. नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे. माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत, असेही ते म्हणाले.

मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून समर्थ आणि आजपर्यंत अनेक लोकांनी आपल्या परीने योगदान दिले आहे. आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. समर्थांच्या साहित्याबद्दल आज दिवसभरात भरपूर चर्चा झाली असेल. यानंतर आपल्याला नक्कीच असे वाटले असेल की समर्थांचा जो भारत, समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे, असेही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले.

Share