विमानतळ परिसरात ड्रोन उडताना दिसताच शुट करण्याचे आदेश

औरंगाबाद : विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ड्रोन उडताना दिसल्यास त्याला थेट शूट करण्याचे आदेश केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला देण्यात आले आहेत. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्राच्या तीन किलोमीटर क्षेत्रात विनापरवानगी ड्रोन उडविल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रात विना परवानगी ड्रोन उडवल्याने मागील तीन वर्षांत २ जणांवर विमानतळ प्राधिकरणाने कारवाई केली. २०२१ मध्ये केंद्र शासनाने केलेल्या ड्रोन विषयक नियमावली नुसार ही कारवाई केली आहे.

विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ड्रोन उडताना दिसल्यास प्रथम त्याला उतरण्याचा इशारा द्यावा. ड्रोन आदेश पाळत नसेल तर त्याला शूट करण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्राच्या तीन किलोमीटर क्षेत्रात विना परवानगी ड्रोन उडविल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा स्पष्ट आदेशही दिला आहे. विमानतळ सुरक्षितता तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन उडवायचे असल्यास विमानतळ प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. जून २०२१ मध्ये जम्मू येथील विमानतळावर स्फोटके असलेले दोन ड्रोन आढळले होती. या पार्श्वभूमीवर ही नियमावली केली आहे. ड्रोन किंवा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या विमानांच्या साहाय्याने शहरावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. यासाठी केंद्र शासनाने या संदर्भातील नियम कडक केले आहेत.

Share