आणखी एका बंगाली अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; मंजुषा नियोगीचा राहत्या घरात सापडला मृतदेह

कोलकाता : विदीशा डे मजुमदार आणि पल्लवी डे यांच्या मृत्यूनंतर आता आणखी एका अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मॉडेल आणि बंगाली टीव्ही मालिकातील अभिनेत्री मंजुषा नियोगी हिचा मृतदेह शुक्रवारी (२७ मे) सकाळी राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

दोन दिवसांपूर्वी विदीशा डे मजुमदार हिचा मृतदेहही तिच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. विदीशा डे आणि मंजुषा नियोगी या दोघी जवळच्या मैत्रिणी होत्या. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिचाही १२ दिवसांपूर्वी (१५ मे रोजी) लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या दोन घटना ताज्या असतानाच आज सकाळी अभिनेत्री मंजुषा नियोगी हिचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मंजुषा नियोगीचे पालक घरी नव्हते. ते तिला फोन करत असताना तिने कोणाच्याही फोनला उत्तर दिले नाही. त्यानंतर नेमके काय झाले आहे हे पाहण्यासाठी पालक घरी आले असत, त्यांना मंजूषाच्या खोलीत तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मंजुषा ही टीव्ही अभिनेत्री विदीशा डे मजुमदारची चांगली मैत्रीण होती. विदीशाच्या मृत्यूनंतर ती डिप्रेशनमध्ये होती, अशी माहिती तिच्या घरच्यांनी दिली आहे. मात्र, अचानक मंजुषाने आत्महत्या केल्याने अभिनेत्रीच्या मृत्यूमागे काय रहस्य आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. मागील १५ दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक तीन अभिनेत्रींच्या संशयास्पद मृत्यूने बंगाली सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. विदीशा डे आणि पल्लवी डे यांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे आणि त्याचदरम्यान मंजुषा नियोगी हिच्या संशयास्पद मृत्यूने बंगाली सिने आणि टीव्ही इंडस्ट्री हादरली आहे. या तीनही अभिनेत्रींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले असून, तिघीही नैराश्याशी झुंज देत होत्या. मंजुषा तिची मैत्रीण विदीशा डे हिच्या मृत्यूपासून डिप्रेशनमध्ये होती. मैत्रिणीच्या मृत्यूचे दुःख तिला सहन होत नव्हते. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरुवातीच्या तपासात मंजुषाही तिच्या करिअरमुळे नैराश्यात होती, असे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

https://www.instagram.com/p/CZ6RlAGv01M/?utm_source=ig_web_copy_link

पल्लवी डेच्या मृत्यूप्रकरणी लिव्ह-इन पार्टनरविरुद्ध गुन्हा दाखल
पल्लवी डेच्या निधनाची बातमी १५ मे रोजी समोर आली. तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत तिच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासाअंती तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. मात्र, पल्लवीच्या वडिलांनी अभिनेत्रीचा लिव्ह-इन पार्टनर सागनिक चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले. पल्लवीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सागनिक चक्रवर्ती आणि त्याच्या एका मैत्रिणीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

https://www.instagram.com/p/CdcQh6uvHWc/?utm_source=ig_web_copy_link

या सेलिब्रिटींचाही संशयास्पद अवस्थेत झाला मृत्यू
गेल्या काही वर्षांत समीर शर्मा, आसिफ बसरा, जयश्री रमैया सौजन्या म्हणजेच सावी मडप्पा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा अचानक संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृतदेहही त्याच्याच अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, ज्याची चौकशी अजूनही सुरू आहे. बंगाली टीव्ही अभिनेत्री दिशा गांगुलीने वयाच्या २२ व्या वर्षी आत्महत्या केली. रिपोर्ट्सनुसार, ती समलैंगिक संबंधात होती आणि सामाजिक दबावामुळे तिने असे पाऊल उचलले. २०१८ मध्ये बंगाली टीव्ही अभिनेत्री मोमिता साहा हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.

Share