नाहीतर शंभर आचारी, रस्सा भिकारी ‘सामना’च्या अग्रलेखातून; विरोधी पक्षांचे टोचले कान

मुंबई : भारतीय जनता पक्ष राहुल गांधी भारत जोड यात्रेमुळे डटमळला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षाने एकदिलाने एकत्र येण्याची हीच वेळ आहे. पाश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, आणि राजस्थान, आदी राज्यांनी मनावर घेतलं तर इतर राज्यामंध्येही जागरण होईल, त्यामुळे  डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून घेऊन पावलं टाकावी लागतील, असं सांगतानाच तसे घडल्यावरच येत्या २०२४ मध्ये बदल होईल. नाही तर शंभर आचारी आणि रस्सा भिकारी असे घडेल, असा इशारा दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून देशातील समस्त विरोधी पक्षांचे कान टोचले आहेत. तसेच, मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस उरल्याचा भाजपा कार्यकर्त्यांना दिलेला इशारा विरोधी पक्षांसाठीही आहे, असंही म्हटलं आहे.

देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय, असा प्रश्न आता पडला आहे. या सगळ्यांना भाजपपेक्षाही काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकाचा राजकीय शत्रू वाटतो व हा विचार विरोधकांच्या कोणत्याही आघाडीस मजबुती देणारा नाही. अखिलेश, केजरीवाल, विजयन, नितीशकुमार यांना कुणाशी लढायचे आहे? काँग्रेसला दुबळे करून हे लोक भाजपशी कसे लढणार? विषय फक्त निवडणुकांचा नाही, तर देशात फोफावलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे. न्यायव्यवस्थेपासून देशातील सर्वच प्रमुख स्तंभांवर हल्ले सुरू आहेत. संविधान, न्यायालयाचेही खासगीकरण सुरू असताना विरोधकांची तोंडे दहा दिशांना कशी राहू शकतात? त्यांचे पाय दोन. त्यामुळे रस्ता एकच, पण दहा डोकी व दहा तोंडांनी बोलणे विचार करणे सुरू आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

भारत जोडो’मुळे विरोधकांना दचकायला काय झालं?
भारतीय जनता पक्ष राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने डचमळला आहे. यात्रा विस्कळीत व्हावी म्हणून कोरोनाचे भय घातले, पण विरोधी पक्षाला दचकायला काय झाले? समस्त विरोधी पक्ष एकदिलाने एकत्र येण्याची हीच वेळ आहे. प. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान अशा राज्यांनी मनावर घेतले तर इतर राज्यांतही जागरण होईल. प्रत्येकालाच नव्या स्वातंत्र्याची व क्रांतीची मशाल पेटवायची आहे, पण लोकनायक जयप्रकाश नारायण होणे आता सोपे नाही. डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून पावले टाकावी लागतील. तसे घडले तर २०२४ ला नक्कीच बदल होईल. नाही तर शंभर आचारी रस्सा भिकारी असेच घडेल! अशा शब्दांत विरोधकांनी एकजूट दाखवण्याचा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

काँग्रेस १०० पार झाली की दिल्लीचा डोलारा…
काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा आकडा ‘शंभर’ पार करणे गरजेचे आहे व आज ही क्षमता फक्त काँगेसमध्येच आहे. काँगेस शंभर पार झाली की दिल्लीतील सध्याचा डोलारा सहज कोसळेल. याचे भान राष्ट्रीय राजकारणात उडी मारणाऱ्या प्रत्येकाने ठेवायला हवे. काँगेसला वगळून किंवा काँग्रेसला लांब ठेवून विरोधी आघाडी करता येणे शक्य नाही. जे अशा विचाराने मेळावा भरवून राष्ट्रीय राजकारणाचा एल्गार करीत आहेत, ते एकप्रकारे भारतीय जनता पक्षाचा २०२४ चा मार्ग मोकळा करीत आहेत, अशी भीतीही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

Share