औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय? असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. राज्यपालंनी माफी मागावी, अन्यथा गरज पडल्यास त्यांच्या वयाचा विचार न करता धोतरही फेडू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना हा इशारा दिला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. माहिती नसलेला इतिहास आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या पोटात जे होतं, ते ओठावर आलेलं आहे. राज्यपालजी, आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज कळले नसतील, तर कृपया त्या विषयात नाक खुपसू नका. चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नका, तुमच्या वयाचा विचार करता, तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, हे कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. भारताचे पंतप्रधानांना विनंती आहे, आवाहन आहे की, तात्काळ अशा राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. यांना छत्रपती शिवाजी महाराजच कळलेले नाहीत. राज्यपाल महोदय, आपण तत्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचं धोतर फेडू. एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो. ‘
राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडणार! pic.twitter.com/0oDxtAiKdi
— Vinod Patil (@vnpatilofficial) February 28, 2022
काय म्हणाले राज्यपाल?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला कोण विचारणार होतं. समर्थ यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार होतं’ असं राज्यपाल म्हणाले. तसंच, ‘शिवाजी महाराज हे काही चंद्रगुप्त इतके लहान नाही परंतु, त्यांच्या पाठीमागे जसा आईचा हात होता, तसेच गुरू उभे होते. समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे’ असंही राज्यपाल म्हणाले.