…नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार

मुंबई : राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरणच सुरु आहे. राज्यकर्ते कितीही ‘सकारात्मक’ वगैरे वातावरणाचे दावे करीत असले तरी राज्यात त्याच्या विपरीतच घडत आहे. उद्योग- व्यवसाय राज्याबाहेर जात आहेत. गोवरची साथ आटोक्यात आलेली नाही शेतकरी आधी अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात सापडला होता. आता तो मिंधे सरकारच्या तावडीत सापडला आहे. असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिंदे- फडणीस सरकारवर निशाणा साधला आहे.

खरीपाचे पीक महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्याने मोठया उमेदीने रब्बीचा हंगाम फुलविला आहे. मात्र महावितरण नावाची ‘टोळधाड’ रब्बीचे पीकही उद्ध्वस्त करीत आहे. सरकार म्हणते, ‘फुकाच्या गप्पा मारीत नाही. वीज बिल थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही.’ महावितरण म्हणते, ‘वीज बिल भरा, नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू.’ मिधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे. या कारभाराच्या कचाटयात सापडलेल्या बळीराजाने जगायचे कसे? नगर जिल्हय़ातील पोपट जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का, हाच प्रश्न आहे, असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं
राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरणच सुरू आहे. या सरकारच्या कारभाराने राज्यातील आणखी एका थकबाकीपीडित शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. नगर जिल्हय़ातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. वीज बिलाच्या थकबाकीचे कारण देत महावितरणने पोपट जाधव यांचे वीज कनेक्शन तोडले होते. वीज नसल्याने शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकाचे नुकसान ते पाहू शकले नाहीत. अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि स्वतःला संपवून घेतले. शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत. वीज बिलाची थकबाकी हा सरकारसाठी प्रश्न असला तरी त्याचे उत्तर तुम्ही बळीराजाच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवून मिळविणार आहात का? असा सवाल सेनेनं केला आहे.

थकबाकीसाठी कुठल्याही शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही, असे पत्रक काढल्याच्या गमजा हे सरकार मारते आणि दुसरीकडे नगर जिल्हय़ात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यावर स्वतःचे जीवन संपवून घेण्याची वेळ येते. आता या घटनेवरही मिंधे सरकारतर्फे थातूरमातूर खुलासा केला जाईल. पोपट जाधव यांच्या शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, पण त्यामुळे त्यांचा जीव परत येणार आहे का? त्यांच्या उघडय़ावर पडलेल्या कुटुंबाचे काय? राज्य सरकारकडे या प्रश्नांचे काय उत्तर आहे? अशी थेट सवाल सरकारला विचारला आहे.

‘मुळात हे सरकार स्वतःच मिंधे आहे. त्याला फक्त खोक्यांचीच भाषा कळते. त्यांना त्यांच्याच कारभारामुळे शेतकऱ्यांच्या डोळय़ांत आलेल्या अश्रूंची भाषा काय कळणार? तीन दिवसांपूर्वी बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात आम्ही याच प्रश्नावरून राज्य सरकारच्या पाठीत आसुड ओढला होता. त्याच्या फटकाऱ्याने अस्वस्थ झालेल्या सरकारने ‘शेतकऱ्यांनी फक्त चालू वीज बिल भरावे. थकबाकीसाठी कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही, असे पत्रकच शासनाने जारी केले असून तसे आदेश वीज कंपनी, महावितरणला दिले आहेत,’ असा खुलासा केला होता. ऊर्जा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही ग्वाही दिली होती. मात्र या आश्वासनावरच पोपट जाधव यांच्या आत्महत्येने आता प्रश्नचिन्ह लावले आहे. जर वीज कनेक्शन तोडायचे नाही, असे सरकारचे आदेश आहेत तर मग जाधव यांची वीज कशी तोडली गेली? फुकाच्या वगैरे गप्पा आपण मारीत नाहीत, असे म्हणणाऱ्यांचे शब्द आता कुठल्या हवेत विरले? शासनाचे पत्रक महावितरण जुमानत नाही, असाच या घटनेचा अर्थ आहे, असं म्हणत सेनेनं फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Share